‘देवेंद्रजी काय राव तुम्ही…’; चित्रा वाघ यांचा ट्विटवरून मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यातील काही भागात तौक्ते चक्रीवादळ धडकले होते. त्यामध्ये सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला बसला. त्यानंतर आता नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. त्यावरूनच त्यांना महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वप्रथम रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आणि माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, ‘विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत आहे. चार तासांसाठी आलो आहे. फोटोसेशन करायला आलो नाही. मला त्याची गरज वाटत नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

चित्रा वाघ यांनी ट्विट करून निशाणा साधला. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘देवेंद्रजी…काय राव तुम्ही थेट दुष्काळीभागात लोकांच्या मदतीला पोहोचता मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना. 3 तासांच्या कोकणदौर्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या कितींचे सात्वंन केलं हे सगळं कृपा करून विचारू नका. आणि हो पर्यटनफोटोसेशन 3 तासात शक्य नाही म्हणून रद्द केलयं’.

फोटोसेशनची गरज नाही

मुख्यमंत्री केवळ चार तासांसाठी कोकणचा दौरा करत आहेत, अशी टीका भाजपकडून केली जात आहे. त्यावर चार तासांसाठी आलो आहे. फोटोसेशन करायला आलो नाही. मला त्याची गरज वाटत नाही, असा टोला लगावला.

आम्हाला राजकारण करायचं नाही

तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. जे काही नुकसान झाले आहे, केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देणार आहोतच आणि राज्य सरकार म्हणून आणखी जे काही करता येणे शक्य हवे ते केले जाईल. याशिवाय पंतप्रधान संवेदनशील आहेत, आम्हाला राजकारण करायचे नाही, असेही ते म्हणाले.