‘आम्हाला कोणतीही घाई नाही, आम्ही सरकार पाडणार नाही’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. आपापसात विरोधाने भरलेले सरकार लोकांच्या हिताचे नाही. आम्हाला कोणतीही घाई नाही. मात्र, आम्ही डोळे झाकूनही बसणार नाही. आम्ही सरकार पाडणारही नाही, असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस गुरूवारी सायंकाळी औरंगाबाद शहरात पोहोचले. सुरवातीला त्यांनी घाटी रुग्णालयाच्या डीन आणि प्रशासन यांच्यासोबत चर्चा केली. कोरोनाबाधितांच्या वॉर्डला देखील भेट दिली. कोरोनाबाधित रुग्णांना काय सुविधा दिल्या जातात?, याबद्दल माहिती घेतली. या दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला सुद्धा भेट दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, औरंगाबादेत चोवीस तासांत कोरोना टेस्टिंगचा रिझल्ट येतोय, ही चांगली बाब आहे. मात्र, खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यासाठी आता नव्या शासन निर्णय (जीआर)ची आवश्यकता आहे. सरकारी योजनेचा फायदा केवळ क्रिटिकल रुग्णांनाच मिळत आहे. तो सगळ्यांना मिळायला पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितले. औरंगाबादमध्ये कोरोनाबाबतीत टेस्ट वाढवण्याची आवश्यकता आहे. घाटी रुग्णालयात स्टाफसहित औषधांची कमतरता आहे, हे फडणवीस यांनी यावेळी सरकारच्या निदर्शनास आणलं आहे.

औरंगाबादमध्ये लॉकडाऊनमध्ये अग्रेसिव्ही टेस्टिंगची आवश्यकता आहे. औरंगाबादकारांनी कर्फ्युला चांगला प्रतिसाद द्या, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांना बांधावर बियाणे आणि खत देणार, अशी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केवळ घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांना दिलेलं बियाणे उगवलं नाही. राज्यात युरियाचा तुटवडा निर्माण झालाय. मूळात सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, असा आरोपही फडणवीस यांनी सरकारवर केला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like