‘भुजबळसाहेब, मी पुन्हा येईन ! तुमच्यासोबत’, फडणवीसांच्या फटकेबाजीनं पिकला ‘हशा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज निवड करण्यात आली आहे. त्यांच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर फटकेबाजी करत त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना चांगलेच धारेवर घेतले. ‘मी पुन्हा येईन म्हणालो पण टाईमटेबल सांगितलं नव्हतं,’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टीकाकारांना उत्तर दिलं. दरम्यान छगन भुजबळ यांना फडणवीसांनी चांगलेच धारेवर धरले होते.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काल सभागृहात अभिनंदन करण्याची माझी तीव्र इच्छा होती. पण काल तसं झालं नाही. आज मी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करतो. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता त्यांच्या मनात ज्या योजना आहेत त्या करायला आम्ही त्यांना मदत करू. मी कायमच संविधान आणि नियमाप्रमाणे वागत आलो आणि संविधानाच्या नियमांना न तोडता त्या नियमांना धरून कामकाज करत आलो. तसेच कालच्या अध्यक्षांच्या निर्णयामुळे आम्ही समाधानी नसल्याने बाहेर पडलो. परंतु त्याचा अर्थ चुकीचा लावण्यात आला,’ असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर करत आपली बाजू सावरली.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणूकीचा काळ चालू होता. त्यावेळेस प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार मी पुन्हा येईन, असं म्हटलं होतं. यावरून त्यांच्यावर मोठी टीका देखील झाली. निवडणुकीच्या आधीच मी पुन्हा येईन असं म्हणून बाकीच्यांचं अस्तित्वच नाहीसं करण्याचा प्रचार फडणविसांनी केला होता. त्यानंतर आता विरोधी पक्षनेता म्हणून भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ‘मी पुन्हा येईन’वरून टोला लगावला होता. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘मी कदाचित पुन्हा तुमच्यासोबतच येईल’, असे फडणवीस म्हटले तेव्हा सगळीकडे हशा पिकला. आता राजकारणात काहीही अशक्य राहिलेलं नाही. शिवसेना ज्यावेळी काँग्रेससोबत जाऊ शकते त्यावेळी काहीही होऊ शकतं, असं म्हणून त्यांनी पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत दिले.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

– लोकशाहीने सगळी कामं करता येतील असा माझा दृढ विश्वास आहे.

– आम्ही शपथेबद्दल जे बोललो त्याबद्दल चुकीचा अर्थ जयंतराव तुम्ही लावला. ती तुमची खासियत आहे.

– ‘भुजबळसाहेब, मी पुन्हा येईन…ते ही तुमच्यासोबत.’

– विरोधक हा शत्रू नसतो.

– आम्ही 70 टक्के जागा जिंकून मेरिटमध्ये आलो.

– जनादेश आमच्या बाजूने होता.

– मी पुन्हा येईन म्हणालो होतो फक्त टाईमटेबल सांगितला नव्हता.

– ‘मेरा पानी उतरते देख, किनारे पर घर मत बना लेना, मैं समुन्दर हूँ, लौट कर जरूर आऊंगा.’

Visit : Policenama.com