संजय राऊतांच्या पत्नीला ED ची नोटीस, फडणवीसांनी दिली खोचक प्रतिक्रिया

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर राज्यातील वातावरण तापू लागलं आहे. ‘आ देखे जरा किसमे कितना है दम… जमके रखना कदम मेरे साथीया’ असं ट्विट करत संजय राऊत यांनी ईडी नोटिशीनंतर पलटवार केला होता. याबाबत आता भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत ट्विट करत असताना, त्यांच्यामध्ये खूप प्रतिभा आहे… त्यांना अनेक शेर-गाणी पाठ आहेत. राऊत यांना दुसरं काम नसतं. त्यावेळी ते शेर आणि गाणी ट्विट करत असतात… त्याच्यावर मी कशाला उत्तर देऊ ? मी ईडी प्रवक्ता नाही त्यांनाच विचारा कुणी चांगलं काम केलं तर त्यांना नोटीस मिळत नाही, चूक नसेल तर कुणी घाबरण्याचे काम नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजप नेत्यांचाही घणाघात

ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आल्यानंतर होत असलेल्या चर्चेबद्दल भाष्य करत भाजप नेत्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. पीएमसी संदर्भात राऊत यांचे आधी काही संबंध होते का याचा खुलासा राऊत करतील का ? त्यांनी ईडीला सहकार्य करावं, अशी खोचक प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

तर भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनीही संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबई पोलीस यंत्रणा वागते त्याचे समर्थन शिवसेना करते आणि ईडी नोटीस आली की सूडाचं राजकारण असं कसं म्हणातात ? असा प्रश्न राम कदम यांनी केला आहे.