‘शिवसेना सत्तेसाठी आणखी किती लाचार होणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस पक्षाकडून सतत महापुरुषांचा अपमान केला जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या शिदोरी या मासिकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर दोन लेख प्रकाशित करण्यात आले असून त्यापैकी एका लेखामध्ये त्यांनी माफीवीर तर दुसऱ्या लेखात त्यांच्याविषयी गलिच्छ लिखाण करण्यात आले आहे. या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच काँग्रेसने यावर माफी मागावी असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवसेना सत्तेसाठी किती लाचार होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसने महापुरुषांच्या अवमानाची मालिकाच सुरु केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे शिदोरी या मुखपत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यावर दोन लेख लिहण्यात आले आहेत. त्यापैकी एक लेख स्वातंत्र्यवीर नव्हे माफीवीर असा असून दुसरा लेख अंधारातील सावरकर असा आहे. अतिशय गलिच्छ आणि विकृत स्वरुपाचे लिखाण या दोन्ही लेखांमधून करण्यात आले आहे. आता या ताज्या अंकातील लिखाणावर शिवसेना सहमत आहे का ? सत्तेसाठी आणखी किती लाचारी पत्करणार, याचे उत्तर शिवसेनेने द्यावे, असे फडणवीस म्हणाले.

मध्यप्रदेशात शिवरायांचा अपमान तर राजस्थानमध्ये सावरकरांचे छायाचित्र काढण्याचा फतवा असे एकापाठोपाठ एक प्रकार होत असतानाच त्याच काँग्रेस पक्षाला मित्रपक्ष म्हणून स्विकारणाऱ्या शिवसेनेला महाराष्ट्राला उत्तर द्यावे लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच मध्य प्रदेश सरकारने तात्काळ माफी मागून ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता, त्याच ठिकाणी पुन्हा पुतळा बसवावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही. याची सरकारने दखल घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.

You might also like