तुकोबांचा अभंग म्हणत फडणवीसांचा ठाकरे सरकारवर ‘निशाणा’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (bjp leader devendra fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोश्यारींना सरकारनं दिलेलं भाषण एखादं चौकातलं भाषण वाटतं. त्यात यशोगाथाच नव्हे, केवळ आणि केवळ व्यथाच दिसतात, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) लक्ष्य केलं आहे.

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, म्हणाले, राज्य सरकारनं राज्यपालांना दिलेल्या भाषणात आम्ही हे केलं आणि ते केलं, याचाच उल्लेख केला. कोविड सेंटर्स उभारली, जम्बो कोविड सेंटर्स बांधली, प्रयोगशाळ्या उभारल्या, अशा गोष्टी राज्यपालांच्या भाषणात होत्या. पण आकडेवारी अजिबात नव्हती. सरकारनं केलेल्या उपाययोजनांमुळे किती जणांचे प्राण वाचले, किती जणांच्या चाचण्या झाल्या, याची कोणतीही आकडेवारी सरकारनं दिली नाही. किमान या कोविड सेंटर्समुळे किती जणांची घरं भरली, याची तरी माहिती द्यायला हवी होती, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, शेतकरी प्रश्न, त्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई, थेट परकीय गुंतवणूक, वीज बिल यासारख्या अनेक विषयांवरून फडणवीसांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. त्यांनी भाषणाच्या शेवटी संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला दिला.

‘नका दंत कथा येथे सांगो कोणी ! कोरडे ते मानी बोल कोण !!
अनुभव येथे पाहिजे साचार ! न चलती चार आम्हांपुढे !!
वरी कोण मानी रसाळ बोलणे ! नाही झाली मने ओळखी तो !!
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी ! राजहंस दोन्ही वेगळाली !!
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ! येर गबाळ्याचे काय काम !!

संत तुकोबांच्या अभंगाचा संदर्भ देत फडणवीसांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. तसेच तीन पक्षांचं सरकार अनेक गोष्टींमध्ये दिरंगाई करत असल्याची टीका त्यांनी केली. ‘एखादा विभाग स्टूल खरेदीसाठी मंत्रालयाशी पत्रव्यवहार करतो. मग मंत्रालयाकडून त्या विभागाला तुम्ही स्टूलची उंची किती हवी तेच नमूद केली नसल्याचं पत्रातून कळवलं जातं. उंची नमूद केल्यावर स्टूल लाकडी हवा की लोखंडी की फायबरचा याबद्दल मंत्रालयातून विचारणा होते. त्याला पत्रानं उत्तर दिल्यावर स्टूलाला किती पाय हवेत असा प्रश्न विचारला जातो. मग पुन्हा स्टूलाचं वजन किती हवं याची विचारणा होते. शेवटी तो स्टूल काही संबंधित विभागाला मिळत नाही. मग एखादी घटना घडल्यावर मंत्रालयातून स्टूलाबद्दल विचारलं जातं. तेव्हा संबंधित विभाग पत्रव्यवहाराचे इतके कागद झाले की आम्ही आता त्यांचाच स्टूल म्हणून वापर करत असल्याचं सांगतो,’ असा किस्सा सांगत फडणवीसांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला डिवचलं.