ठाकरे सरकारच्या कामकाजावर फडणवीसांनी सांगितली भन्नाट गोष्ट, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यातील तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार अनेक गोष्टीमध्ये दिरंगाई करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एखादा विभाग स्टूल खरेदीसाठी मंत्रालयाशी पत्रव्यवहार करतो. मग मंत्रालयाकडून त्या विभागाला तुम्ही स्टूलची उंची किती हवी ते नमूद केले नसल्याचे पत्रातून कळवले जाते. उंची नमूद केल्यावर स्टूल लाकडी हवा की लोखंडी की फायबरचा याबद्दल मंत्रालयातून विचारणा होते. त्याला पत्राने उत्तर दिल्यावर स्टूलाला किती पाय हवेत, मग पुन्हा स्टूलाच वजन किती हव याची विचारणा होते. शेवटी तो स्टूल काही संबंधित विभागाला मिळत नाही. मग एखादी घटना घडल्यावर मंत्रालयातून स्टूलाबद्दल विचारल जाते. तेंव्हा संबंधित विभागाचे पत्रव्यवहाराचे इतके कागद झाले की आम्ही आता त्यांचाच स्टूल म्हणून वापर करत असल्याचे सांगतो, असा किस्सा सांगत फडणवीसांनी ठाकरे सरकारच्या कामावर टीकास्त्र सोडले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 2) राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोश्यारींना सरकारने दिलेले भाषण एखाद चौकातील भाषण वाटते. त्यात यशोगाथाच नव्हे, तर व्यथाच दिसतात, असे ते म्हणाले. तसेच ठाकरे सरकारला कोरोना हाताळण्यात अपयश आले आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 9 टक्के लोकसंख्या आपल्या राज्यात आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 40 टक्के कोरोना रुग्ण राज्यात आहेत. सध्या राज्यात 46 हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी आकडेवारी फडणवीस यांनी विधानसभेत सांगितली. मुख्यमंत्र्यांनी आधी माझी कुटुंब माझी जबाबदारी अभियान आणले. आता मी जबाबदार मोहीम सुरू आहे. म्हणजे सरकार स्वत: कशासाठीच जबाबदार नाही. कोरोनाचे रुग्ण वाढल्यावर खापर जनतेवर फोडायचे. इतर गोष्टींसाठी मोदी सरकारला जबाबदार धरायच. मग राज्य सरकार नेमकं काय करतंय, असा सवाल त्यांनी विचारला आहे.