उध्दव ठाकरेंच्या नावापुढं मुख्यमंत्री लिहीलं नाही, देवेंद्र फडणवीस झाले ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६० वा वाढदिवस. पण यावर्षी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून कार्यालय अथवा ‘मातोश्री’ निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करु नये, असे आवाहनही करण्यात आलं आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या नावापुढे ‘मुख्यमंत्री’ हा शब्दच लिहला नसल्याने सोशल मीडियावर फडणवीसांना ट्रोल करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धवजी आपणास वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, या शुभकामना,असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विट वरुन नेटकऱ्यांनी फडणवीसांना ट्रोल केलं आहे. कारण फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावापुढे मुख्यमंत्री अथवा शिवसेना प्रमुख असे लिहलं नाही. थेट उद्धवजी असा उल्लेख करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. म्हणून सोशल मीडियावर त्यांच्यावरती प्रचंड नाराजी पसरली आहे.

फडणवीसांना हा प्रकार नेटकऱ्यांनी लक्षात आणून देत त्यांच्यावर टीकास्त्र देखील सोडलं आहे. तुम्ही मुख्यमंत्री लिहायला विसरलाच पण मुख्यमंत्री कार्यालयालाही टॅग करायला विसरला. तुमचं पद गेलंय यावर तुमचा अजूनही विश्वास बसला नाही का? असा टोला लगावला आहे. तर दुसऱ्याने कदाचित यांना आठवण नसेल, वजन जास्त वाढलं की होत असत तसं, असं म्हटलं आहे. एकाने तर मुख्यमंत्री लिहायला मोठं मन लागते ते तुमच्याकडे नाही, असे म्हणत चिमटा काढला आहे. अनेक जणांनी फडणवीस यांच्या ट्विटर अकाउंट वर येऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत फडणवीसांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

अजित पवारांच्या ट्विटची चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात अजित पवारांनी एक फोटो ट्विट केलाय. या फोटोत अजित पवार आणि उद्धव ठाकरे एकाच गाडीत बसलेले पाहायला मिळतात. पण या गाडीचं स्टिअरिंग व्हील मात्र अजित पवार यांच्या हातात आहे. त्यामुळे पवारांनी शेअर केल्या फोटोमुळे आता महाविकास आघाडीचे ‘स्टिअरिंग’ नक्की कुणाच्या हातात आहे हा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारला जातोय.