‘… म्हणून सचिन वाझेंचे सर्व मालक अस्वस्थ आणि चिंतीत’ : देवेंद्र फडणवीस

पोलीसनामा ऑनलाइन टीम : सचिन वाझेंचे सर्व मालक अस्वस्थ आणि चिंतीत आहेत असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी सचिन वाझे प्रकरणावर (Sachin Vaze) भाष्य केलं.

‘जेवढे वाझेंचे मालक आहेत ते सर्वच्या सर्व घाबरलेले आहेत, कोणत्या गोष्टी बाहेर येतील यांची त्यांना भीती’
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राची बदनामी सचिन वाझे प्रकरणामुळं सर्वात जास्त झाली. एवढी दुसऱ्या कोणत्याच प्रकरणानं झाली नाही. नवाब मलिक चिंतीत आहेत कारण फोन टॅपिंग प्रकरणात अनेक लोकांचे बिंग फुटेल. खरं तर हा रिपोर्ट नवाब मलिकांनी फोडला. नवाब मलिक आणि त्यांचे सर्व सहकारी घाबरलेले आहेत की, वाझे आता काय बोलतील ? जेवढे वाझेंचे मालक आहेत ते सर्वच्या सर्व घाबरलेले आहेत. आता कोणत्या गोष्टी बाहेर येतील अशी भीती त्यांना वाटत आहे असंही फडणवीस म्हणाले.

‘राज्यात सिंडेकेट राज सुरू’
पुढं बोलताना फडणवीस म्हणाले, राज्यात एक प्रकारे सिडेंकेट राज सुरू होते. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची बदनामी आम्ही केली नाही. हे सिंडेकेट राज चालवले, ज्यांनी 17 वर्षांनंतर वाझेला नियमबाह्य असतानाही महत्त्वाचं पद दिलं आणि ज्यांनी सर्वच्या सर्व केसेस वाझेकडे दिल्या व मुंबई पोलीस ज्यांचे नाव स्कॉटलंड यार्ड पोलिसांपेक्षाही चांगलं होतं, त्याला बदनाम करण्याचं काम केलं. आता तेच प्रश्न विचारत आहेत अशी टाकाही फडणवीसांनी यावेळी बोलताना केली.

‘सचिन सावंतांना काय उत्तर द्यायचं. त्यांना काय समजतं ?’
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर अनेक गंभीर आरोप केले होते. यावर बोलताना फडणवीसांनी खोचक उत्तर दिलं. ते म्हणाले, सचिन सावंतांना काय उत्तर द्यायचं. त्यांना काय समजतं ? ते रोज काहीही बोलतात. आमचे राम कदम आहेत, ते त्यांना उत्तर देतील. मला त्यांना उत्तर द्यायची गरज नाही असा टोलाही त्यांनी लगावला.