West Bengal : कॉंग्रेस नेते अधीर चौधरी यांना भाजपची खुली ऑफर, म्हणाले- ‘तुमच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमी खुले, कधीही या स्वागतच’

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. तृणमूल काँग्रेसला अनेकजण सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आता लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना भाजपने खुली ऑफर दिली आहे. काँग्रेसमध्ये चौधरी यांचा योग्य सन्मान केला जात नाही. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी थेट ऑफर भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी चौधरी यांना दिली आहे. तसेच भाजपचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमीच खुले आहेत. त्यांनी कधीही यावे, असे घोष यांनी म्हटले आहे.

चौधरी हे काँग्रेसमधील बडे नेते आहेत. अशा बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये योग्य सन्मान केला जात नाही. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच आहे. अधीर बाबू आमचे जुने-जाणते नेते आहेत. राजकारणातील ते वरिष्ठ नेते आहेत. काँग्रेस त्यांना अपमानित करत आहे, तसेच त्यांचा अनादर केला जात आहे. दरम्यान, काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी युती केली असून, त्यात आता मुस्लीम धर्मगुरू अब्बास सिद्दीकी यांचा इंडियन सेक्युलर फ्रंट हा पक्षही सहभागी झाला आहे.