एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप करणार्‍या ‘त्या’ इथिकल हॅकरची चर्चा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप करून चर्चेत आलेला हॅकर मनीष भंगाळे हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भंगाळेच्या मदतीनं अत्यंत अभ्यासपूर्ण तपास करून व सापळा रचून जळगाव पोलिसांनी सुमारे 412 कोटी रुपयांच्या ऑनलाईन चोरीच्या प्रयत्न हाणून पाडला आहे.

हेमंत ईश्‍वरलाल पाटील (पत्रकार) (वय- 42, रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर), बांधकाम ठेकेदार मोहसीन खान ईस्माईल खान (वय-35, रा.देवपूर, धुळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यांना 20 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. देशभरातील विविध ठिकाणच्या सात संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधात चार पोलिसांची पथक रवाना झाली आहेत.

आरोपींनी एटीएम कार्ड क्लोनींग करत एक हजार रूपये बँक खात्यातून काढले. त्यानंतर या टोळीचे स्वप्न वाढले. त्यांनी एटीएम कार्ड क्लोन करून सुमारे 412 कोटी रूपये काढण्याचे नियोजन केले होते. परंतु मनीष भंगाळे याने पोलिसांशी संपर्क साधून सर्व हकीगत सांगितली. बँकेतून डेटा गोळा करून चोरीचा करण्याचा प्रयत्न होता. पोलिसांनी मनीष भंगाळेला माफीचा साक्षीदार बनवत सापळा रचून जळगावातून दोघांना अटक केली आहे.देशभरातील बिल्डर, उद्योगपती, राजकारणी, बड्या आसामींचे कोट्यवधी रुपये असलेल्या बँक खात्यांचे डिटेल्स चोरी झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या टोळीमधील आतापर्यंत नऊ संशयित पोलिसांना निष्पन्न झाले असून ते खान्देशासह इतर राज्यातील आहेत. या टोळीमध्ये बँक अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे.

भंगाळे गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती- खडसे
जळगाव पोलिसांनी 412 कोटीच्या लुटीचा डाव उधळून ल लावल्याबद्दल अभिनंदन. परंतु मनीष भंगाळे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. तो माफीचा साक्षीदार झाला म्हणून त्याचे पूर्वीचे सर्व गुन्हे माफ होत नाहीत. त्याच्या यापूर्वीच्या सर्व गुन्ह्याची माहिती पोलिसांनी काढावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर हाच भंगाळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फिरायचा असेही खडसे यांनी यावेळी सांगितलं.