तासाभरात नाथाभाऊ परतले भाजपमध्ये, PM मोदींवर निशाणा साधला खरा पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. इतकेच नाही तर 22 ऑक्टोबरला खडसे भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी मोदींवर केलेल्या टिकेचे ट्विट त्यांनी रिट्विट करुन एकच खळबळ उडवून दिल. पण तासाभरातच त्यांनी माघार देखील घेतली.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर असल्याच्या वृत्ताला आज खुद्द खडसे यांनीच दुजोरा दिला होता. त्याचे झाल असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळावीर देशाला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी कोरोनाची परिस्थिती अजून टळली नाही. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

आपल्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र, यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला, अशी टीका करणारे ट्वीट जयंत पाटील यांनी केले होते. त्यानंतर जयंत पाटील यांचे हेच ट्विट एकनाथ खडसे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन रिट्विट केले होते.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचे ट्विट रिट्विट केल्यामुळे एकप्रकारे खडसे यांनी समर्थन केले, असल्याचं निष्पन्न झाले. या ट्विटमुळे खडसे हे राष्ट्रवादीवासी झाल्याचं शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, ही बातमी सर्वत्र पसरताच एकनाथ खडसे यांनी अवघ्या तासाभरात माघार घेतली. जयंत पाटील यांचे रिट्विट केलेले ट्विट त्यांनी डिलीट करुन टाकले. ट्विट डिलीट करुन खडसे यांनी या वादावर तूर्तास पडदा टाकला आहे. पण राष्ट्रवादीची चर्चा मात्र अद्यापही सुरु आहे.