महावितरणचा एकनाथ खडसेंनाही ‘शॉक’, पाठविले 1 लाख 4 हजारांचे बिल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – महावितरण कंपनीने भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना जळगावमधील मुक्ताईनगर येथील घरासाठी 1 लाख 4 हजार रुपयांचे बिल पाठविले आहे. एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यांचे हे बिल आहे. एवढे वीज बिल आल्याने खडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. राज्य सरकारने याप्रकरणी चौकशी करुन बिलात सूट दिली गेली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

लॉकडाउन कालावधीत येणारी वीज बिले अवास्तव असून ती न भरण्यासारखी आहेत. महावितरणने अशा पद्दतीने लोकांना वेठीस धरु नये. सरकारने अवास्तव बिलांची चौकशी केली पाहिजे. बिलामध्ये सवलत दिली पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. दरम्यान लॉकडाननंतर आलेल्या वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे आदेश देऊ शकत नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ग्राहकांनी याप्रकरणी तक्रार निवारण मंचाकडे दाद मागण्याच्या निर्देशांचा पुनरूच्चार केला आहे. ग्राहकांच्या तक्रारींवर विलंब न करता तातडीने निर्णय देण्याचे आदेशही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने वीज नियामक मंडळ तसेच वीजपुरवठादार कंपन्यांना दिले आहेत.