शिवसेनेचा भाजपवर ‘पलटवार’ ?, ‘या’ बड्या नेत्याला पक्षात घेण्यासाठी ‘हालचाली’

0
5
shiv sena
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप आणि शिवसेना यांच्यातील कुरघोडीचे राजकारण सर्वांना परिचित आहे. दोन्ही पक्ष एकत्र होते तेव्हा देखील ते एकमेकांबद्दल टीका टिप्पणीची संधी सोडत नव्हते. आता ते प्रमाण अधिक वाढले असून दोन्ही पक्ष आता विरोधक म्हणून आमनेसामने येऊन टोकाची भूमिका पार पाडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीआधी भाजपने नारायण राणे यांना पक्षात घेऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला. कारण नारायण राणे हे शिवसेनेचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यानंतर आता शिवसेनाही भाजपवर पलटवार करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसतेय.

विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपाने मेगाभरती करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते आपल्या बाजूने वळवले होते. परंतु डाव उलटला आणि राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची चांगलीच गोची झालीय. या मेगाभरतीमुळे भाजपाने आपल्या अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट नाकारून आयारामांना तिकीट आले होते. मात्र या निर्णयामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज होते. आता राज्यातून भाजपची सत्ता गेल्यानंतर तर एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जाहीर टीका सुरू केली आहे. त्यांच्या सारखेच अनेक नेत्यांना डावलण्यात आले होते त्यांनी आता भाजपाविरुद्ध बंड पुकारले असून या सगळ्या असंतुष्टांचं नेतृत्व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे.

खरतर गेल्या ५ वर्षांपासून खडसेंची नाराजी आहे कारण खडसे गेल्या ४० वर्षांपासून भाजपा सोबत असून त्यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आहेत. तरीही २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात न पडता फडणवीसांच्या गळ्यात पडली. आणि आत्ता विधानसभेत तर त्यांना तिकीटच नाकारण्यात आले म्हणून एकंदरीत सर्व परिस्थिती बघता खडसेंना शिवसेनेने आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचे सूत्रांकडून समजते. प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली असून भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं अशी भूमिका मांडल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हे नेते शिवसेनेशी संपर्क साधतात का हे पाहणे पुढील काळात महत्वाचे ठरणार आहे.

प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केले आहे की, ‘भाजपमध्ये वर्षानुवर्ष ओबीसी नेत्यांवर अन्याय होत आहे. आता हे थांबवण्यासाठी आम्ही एकनाथ खडसे यांची भेट घेतली. तसचं याकरता इतर भाजपच्या नेत्यांची पण भेट घेणार आहे.’ विशेष म्हणजे जे नेते प्रकाश शेंडगे यांच्या सोबत खडसे यांच्या भेटीला गेले होते त्यापैकी एकही जण भाजपचा सदस्य नव्हता. स्वत: प्रकाश शेंडगे हे देखील सध्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे इतर नाराज भाजप नेतेही शिवसेनेसोबत जाण्याचा विचार करत आहेत का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. आता भाजपा सारखी मेगाभरती शिवसेनेत होण्याची चिन्ह आजमितीला दिसत आहेत.

विशेष म्हणजे एकनाथ खडसेंना शिवसेना आपल्या पक्षात घेण्यासाठी योजना आखत असून भाजपावर पलटवार करण्याची संधी शिवसेना सोडणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. आता एकनाथ खडसे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण खडसेंनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्रात राजकीय समीकरणे ही बदलू शकतात. येणाऱ्या काळात ते स्पष्ट होईलच.