शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर एकनाथ खडसे म्हणाले…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षांतर करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी अनेक वेळा ही नाराजी प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता खडसे यांची राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती समजते आहे. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खडसेंच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

‘एकनाथ खडसे यांच्यासोबत माझी चर्चा झाली. मात्र त्यांचं समाधान करण्याइतपत साधनसामुग्री माझ्याकडे नाही,’ असे शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या भेटीसंदर्भात सांगितले. मात्र पवारांच्या या वक्तव्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण केला. याबाबत खडसेंना विचारण्यात आल्यावर त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं.

दरम्यान, ‘आपण पक्ष चालवला आहे. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की कोणत्याही पक्षाला अशी पाच दिवसाची मुदत देता येत नाही. त्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो. त्यामुळे आपल्याला त्रास देणाऱ्यांवर पाच दिवसात कारवाई नाही झाल्यास आपण पक्ष बदलणार ही माध्यमांच्यामध्ये येणारी बातमी चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे,’ असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

दरम्यान, औरंगाबादमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत शरद पवार यांनी केलेल्या व्यक्तव्यामुळे रंगलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे एकनाथ खडसे येत्या काळात नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/