एकनाथ खडसेंची भाषा बदलली, केलं देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरून ‘कौतुक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणातून बाजूला फेकले गेलो असं म्हणत फडणवीस यांना जबाबदार धरणारे भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा अचानक सूर बदलला. ‘पक्षात राहीन की नाही भरवसा नाही’ असा इशारा काही दिवसांपूर्वीच देणारे खडसे यांनी फडणवीस यांच्यासह भाजपमधील सध्याच्या नेत्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

मागील चार दिवस झाले विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे विरुद्ध पक्षाची भूमिका मांडत आहे. आम्ही ही विधानसभेत असताना सरकारला असंच जाब विचारायचो असे सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं ते वृत्तवाहिन्यांशी बोलत असताना एकनाथ खडसे म्हणाले.

दिल्लीकरांनी फडणवीसांच्या पारड्यात वजन टाकल्याने एकनाथ खडसेंची संधी हुकली तेव्हा पासून ते नाराज होते. त्यानंतर घोटाळ्यांच्या कारणांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून खडसे यांना बाजूला फेकले गेले होते. पंकजा मुंडे यांच्यासोबत घेतलेल्या एका मेळाव्यात त्यांनी पक्ष सोडण्याचा इशाराही दिला होता. मात्र, आता अचानक खडसे यांनी फडणवीसांसह इतर नेत्यांचं कौतुक केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.