मंत्रिमंडळाच्या विस्तारावर ‘नाथाभाऊ’ची ‘नाराजी’ ; म्हणाले, भाजपाला पक्ष ‘वाढी’साठी इतर पक्षातील नेत्यांची ‘गरज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्यापासून राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्यापूर्वी हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. चार महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या असून त्याआधीचा हा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार आहे. फडणवीस सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्यासह १३ नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा डावलण्यात आलं आहे. यावर पक्षाचा निर्णय मान्य करावा लागतो. पक्ष हितासाठी, पक्ष वाढीसाठी काही निर्णय घेतले जातात. सत्ता आली की सत्तेचे गुण आणि अवगुण लागत असतात अशा शब्दात एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, ‘आमच्याकडे चार-पाच वेळा निवडून आलेले अनेक लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही. स्वाभाविक ते नाराज होतात. मात्र पक्षाचा निर्णय मान्य करावा लागतो. पक्ष हितासाठी, पक्ष वाढीसाठी काही निर्णय घेतले जातात. सत्ता आली की सत्तेचे गुण आणि अवगुण लागत असतात.’

काँग्रेसमधून पक्षांतर केलेल्या विखे पाटलांना मंत्रिपद देण्यात आले. याविषयी बोलताना खडसे म्हणाले की, ‘विखे पाटील यांच्या घराण्याचा राजकीय इतिहास आहे. काँग्रेस, शिवसेना आता भाजपामध्ये येत त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. पक्षाची जमीन भुसभुशीत करण्याचं काम आम्ही केलं त्यामुळे खडसे असले काय नसले काय त्याने काही फरक पडत नाही. भुसभुशीत जमिनीवर कोणतंही पिक घेतलं तरी ते येणारच आहे. पक्षाच्या वाढीसाठी सध्या भाजपाला इतर पक्षातील नेत्यांची गरज आहे. पक्षवाढीसाठी अशा लोकांना पक्षात घेऊन मंत्री केलं जातं.’

सत्तेसाठी पक्ष बदलणं माझ्या स्वभावात नाही. विरोधात असताना अनेक ऑफर आल्या. तुमचा पक्ष सत्तेत कधीच येणार नाही असं सांगितलं गेलं मात्र आज आम्ही सत्तेत आलो. गेली ४० वर्षे पक्षवाढीसाठी आम्ही मेहनत घेतली. इतके वर्ष पक्षासाठी झटलो आहे त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा अजिबात विचार नाही. पुन्हा एकदा मंत्रिमंडळात जाण्याचा उत्साह राहिला नाही. असेही खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे १९९० पासून विधानसभेवर निवडून जात आहेत. दरम्यानच्या काळात खडसे यांनी अर्थमंत्री आणि पाटबंधारे मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. खडसे भाजपकडून गेल्या कित्येक दिवसांपासून उपेक्षीत आहेत. एमआयडीसी घोटाळ्या बरोबर अनेक आरोप खडसेंवर करण्यात आले होते. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपावरुन विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली होती. २०१४ मध्ये महसूलसह इतर खात्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा खडसे यांना द्यावा लागला होता. त्यानंतर खडसे यांनी अनेकवेळा नाराजी बोलून दाखवली. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहीले, म्हणून अनेकांची झोप उडाली असे त्यांनी एका कार्य़क्रमात बोलून दाखवले होते.