एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढवण्याचे ठाकरे सरकारचे प्रयत्न, नाथाभाऊंनी दिलं ‘हे’ उत्तर

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन भाजप सरकारच्या काळात काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर काही कालावधीनंतर त्यांना क्लिनचिट देण्यात आली. या मुद्यावर भाजपला घेरण्यासाठी आघाडी सरकारने रणनिती आखली असल्यची चर्चा आहे. या सर्व प्रकरणाचा अहवाल आगामी विधिमंडळ अधिवेशनात आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेल्यापैकी माजी मंत्री पकंजा मुंडे, प्रकाश मेहता, जयकुमार रावल आणि विष्णू सावरा यांना क्लिन चिट देण्यात आली. तर एकनाथ खडसेंची चौकशी लावण्यात आली.

चौकशीवर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, माझ्यावर आक्षेप घेण्यात आलेला होता. आणि त्यानुसार झोटिंग कमिटी नियुक्त करण्यात आली होती. झोटिंग समितीने आपला अहवाल विधानमंडळात दिला. या अहवालानुसार लाचलुचपत विभागाने गुन्ह्याची नोंद केली. या गुन्ह्याची संपूर्ण चौकशी झालेली आहे. त्यांनी आपला अहवाल न्यायालयात क्लोजर म्हणून सादर केला आहे. या अहवालात भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत कोणतेही तथ्य नसल्याचे खडसे यांनी म्हटले असून त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

एकनाथ खडसे पुढे बोलताना म्हणाले, या प्रकरणाशी माझा कसा संबंध आला हे आपल्याला माहित नाही. एक रुपयांचा व्यवहार मी या प्रकरणामध्ये केलेला नाही. जमीन मी स्वत: खरेदी केलेली नाही. व्यवहार झालेला आहे तो माझ्या कुटुंबाकडून झालेला आहे. त्यामुळे जर आगामी काळात पुन्हा विधानभवनात अहवाल आणण्यात आला तर त्यामध्ये माझ्या नावावर कोणते आक्षेप घेतले जातात, याची उत्सुकता मला लागून राहिली असल्याचा उपरोधक टोला खडसेंनी लगावला.