एकनाथ खडसेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘मुलीची शपथ घेऊन फडणवीसांनी राज्यपाल पदाची ऑफर दिली होती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. आता त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. खडसे म्हणाले, मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती. त्यांनी त्यांच्या कन्येची शपथ घेऊन मला राज्यपाल करणार असल्याचे सांगितले होते, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, मी विधानसभेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मला त्यांच्या अँटीचेंबरमध्ये बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती. त्यावेळी मला काही राज्यपालपदाची इच्छा नाही असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा मुलीची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला राज्यपाल करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठीची त्याला संमती असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं होतं, असे खडसे यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केला.

राज्यसभेत पाठवण्याचे आश्वासन
राज्यपाल पद मिळाले नाही. त्यानंतर फडणवीस यांनी मला पुन्हा राज्यसभेत पाठवणार असल्याचं सांगितलं. राज्यातून राज्यसभेसाठी कुणीही जाणार नाही. फक्त तुमचच नाव पाठवणार आहोत आणि तुमचं नाव पाठवण्यास पक्षश्रेष्ठींची काहीही हरकत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितलं. पण नंतर चार दुसरीच नावं आल्याचे खडसे यांनी सांगितले.

तर धक्का बसेल
माझ्याकडे काही पुरावे आणि फोटोग्राफ्स आहेत. ही माहिती उघड केली तर जरुर धक्का बसेल, असा दावा देखील एकनाथ खडसे यांनी मुलाखती दरम्यान केला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्याकडे नेमके कोणते पुरावे आहेत, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.

मी पुन्हा येणार ही फक्त फडणवीसांची घोषणा
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन… ही घोषणा विधानसभा निवडणुकीत देण्यात आली. ही घोषणा भाजपची नव्हती. ती सुधीर मुनगंटीवार किंवा इतर कोणाचीही नव्हती. ती घोषणा फक्त फडणवीसांचीच होती, असा टोलाही त्यांनी लगावला. प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे यांच्या काळात विरोधी पक्ष म्हणून आम्ही एक दिलाने काम करायचो. महाजन-मुंडेंनी काही प्रश्न हाती घेतला तर भाजपचे सर्वच नेते मोहोळ उठवायचे. त्यातून वातावरण निर्मिती व्हायची. आजच्या भाजपमध्ये ते चित्र पहायला मिळत नसल्याचंही त्यांनी बोलून दाखवले. आपण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होतो म्हणूनच आपल्याला खड्यासारखे बाजूला केल्याची खदखदही त्यांनी बोलून दाखवली.