भाजपचे एकनाथ खडसे ‘वेटींग’वर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपकडून मिळत असलेल्या वागणुकीवरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज आहेत. खडसे यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. मात्र, त्यांना भाजपच्या एकाही नेत्याची भेट न घेता ते मुंबईत परतले. मुंबईत परतल्यानंतर ते आज मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र, त्यांना शिवसेनेकडून सध्या तरी वेटींगवर ठेवण्यात आले आहे.

भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांच्या मनात नेमके काय चालले आहे याचा थांगपत्ता लागत नाही. काल शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेकडून त्यांना भेटीची वेळ अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही भेट होणार आहे की नाही यावर अद्याप काहीही सांगता येत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून अनेक नेत्यांना डावलण्यात आले होते. यामध्ये खडसेयांच्यासह विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांचा समावेश आहे. तर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. मुंडे यांनी आपली नाराजी फेसबुकवरून व्यक्त केली होती. त्यानंतर खडसे आणि तावडे यांची भेट झाली. त्यानंतर ओबीसी नेत्यांना बाजूला केला जात असल्याचे सांगण्यात येत होते.

दरम्यान, खडसे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर काँग्रेसकडून त्यांना ऑफर देण्यात आली आहे. अशीच चर्चा निवडणुकीपूर्वी होती. मात्र, भाजपने एकनाथ खडसे यांच्या मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यामुळे खडसे यांचे तात्पुरते का होईना त्यांचे बंड शमले होते. मात्र, मुलीच्या पराभवानंतर त्यांनी आपल्या मनातली खदखद अनेकवेळा उघडपणे बोलून दाखवली. त्यामुळे पुन्हा एकदा खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चांना जोर धरला आहे.

Visit : Policenama.com