फडणवीस सरकारकडून एकनाथ खडसेंचाही फोन ‘टॅप’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फडणवीस सरकारच्या काळात विरोधकांप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा देखील फोन टॅप करण्यात आला होता अशी चर्चा सध्या सुरु आहे. मागच्या सरकारमधील सत्ताधारी मंडळींनी शासकीय यंत्रणेचा वापर राजकीय फायदा करुन घेण्यासाठी तीन पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप फडणवीस सरकारवर करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी गृह विभागाने दोन सदस्यीय समिती नेमली आहे.

फोन टँपिंगच्या चौकशीसाठी गृह विभागाने अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि गुप्तचर विभागाचे पोलीस सहआयुक्त अमितेश कुमार यांची दोन सदस्यीय समिती नेमली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मागील वर्षभर फोन टॅप केल्याचा आरोप होता. आता भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचा देखील फोन टॅप करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.

एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपद सोडले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी खडसे भाजप विरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा होती. आता, त्यांचा फोन टॅप केला असल्याची माहिती समोर आल्याने नेमण्यात आलेली चौकशी समिती खडसे यांच्या फोन टॅपिंगची चौकशी करणार आहे. गृह विभागाने नेमलेल्या समितीला सहा आठवड्यांचा कालावधी देण्यात आला असून त्यांना आपला आहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

पोलीस अधिकारी बळीचा बकरा
फोन टॅपिंगची चौकशी करण्याचे जाहीर झाल्याने काही पोलीस अधिकाऱ्यांची गाळण उडाली असल्याचे बोलले जात आहे. अधिकारी हे सरकारच्या आदेशानुसार काम करतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवले जाऊ नये असे बोलले जात आहे. या प्रकरणामध्ये एक ज्येष्ठ अधिकारी गुंतला असल्याची शक्यता एका ज्येष्ठ मंत्र्याने वर्तवली आहे. तसेच इस्त्रायलला जाऊन कुणी नेमके कोणते प्रशिक्षण घेतले हे जाणून घेण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यास त्याचे धागे – दोरे दिल्लीपर्यंत पोहचू शकतात, असे मंत्र्याचे म्हणणे आहे.