एकनाथ खडसे यांचे पक्षांतर होणार हे सत्य ! ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राज्यभरात सुरू असतानाच, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने मोठे विधान केले आहे. खडसे हे सध्या कोणाच्या संपर्कात आहेत, या बद्दल मला माहिती नाही, मात्र ते पक्षांतर करतील हे सत्य आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते आणि सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी जळगाव येथे करून नवीनच संभ्रम निर्माण केला आहे.

जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी अशाप्रकारचे संकेत दिल्याने खडसे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत जाणार? असा संभ्रम निर्माण झाला आहे. मागील चार दिवसांपासून खडसे मुंबईत होते, मात्र त्यांनी शरद पवारांची भेट घेतली नाही, असे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले होते.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी जळगावमध्ये जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन चाचपणी केली होती. या बैठकीतही खडसे यांच्या नावाची चर्चा होती. तेव्हापासून खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे. परंतु, त्यानंतर मागील चार दिवस मुंबईत राहूनही खडसे हे शरद पवारांची भेट न घेताच जळगावला परतल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात कोणतीही मोठी घडामोड झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगवून खडसे मागच्या दाराने शिवसेनेत तर जाणार नाहीत ना? अशीही चर्चा आता रंगली आहे. आजच्या गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने या शक्यतेला बळ दिले आहे. एकुणच खडसे येत्या काही दिवसात कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.