राज्यसभेची संधी हुकल्यानंतर एकनाथ खडसेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – या महिन्याच्या अखेरीस रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या जागांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केली असून त्यात महाराष्ट्रातल्या 3 जागांचीही घोषणा झाली आहे. त्यामध्ये उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्षाचे रामदास आठवले यांचा समावेश आहे. आता भाजपने तिसरे नाव जाहीर केल्याने एकनाथ खडसे आणि सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या नावाला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपकडून डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.

महाराष्ट्रातून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी एकनाथ खडसे यांचा पत्ता कट करून भागवत कराड यांना उमेदवारी दिली. यावर बोलताना एकनाथ खडेसे म्हणाले, राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती हे खरं आहे. मात्र, मलाच तशी अपेक्षा नव्हती, अशा मोजक्या शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे म्हणाले, पक्षाला योग्य वाटला तो निर्णय त्यांनी घेतला. राज्याच्या राजकारणात मला जेवढा रस आहे. तेवढा दिल्लीच्या राजकारणात नाही हे मी आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळं माझ्या नावाची चर्चा असली तरी मला अपेक्षा नव्हती, असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. पक्षानं तुमची नाराजी दूर करण्याची संधी घालवली असं तुम्हाला वाटतं का, या प्रश्नावर काहीही बोलण्यास खडसे यांनी टाळलं.