‘कोविड-19’ सेंटरसाठी लवासा ताब्यात घ्या, खासदार गिरीश बापट यांचा सल्ला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजप खासदार गिरीश बापट यांनी लवासामधील जागा कोविड केअर सेंटरसाठी ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अतिरिक्त बेड उपलब्ध करण्यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त बेड्स तयार करण्यासाठी शाळा, खासगी रुग्णालये आणि हॉटेल्स ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. परंतु यादरम्यान बापट यांनी लवासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना एक पत्र पाठवले असून कोविड केअर सेंटरसाठी लवासाच्या जागेचा वापर करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी मुळशी तालुक्यातील लवासा येथे कोविड केअर सेंटर तातडीने उभारण्यात यावे अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे तालुका कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी केली होती. त्यासंबंधीचं निवेदन मारणे यांनी गिरीश बापट यांच्याकडे दिले होते.

त्यानंतर बापट यांनी जिल्हाधिकार्‍यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी पत्र पाठवले होते. मुळशी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्याही वाढत असून तालुक्यातील लोकांसाठीच बेड उपलब्ध नसल्याने त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही मागणी करण्यात आली. दरम्यान, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या प्रस्तावाच्या व्यवहार्यतेविषयी शंका उपस्थित केली आहे. लवासा हे ठिकाण फार दूर असून काही अडचणीदेखील आहेत. विविध बाबींचा विचार केल्यानंतरच अशा सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आगे. गिरीश बापट यांनी काही सूचना केल्या आहेत. जेव्हा गरज असेल त्यावेळी आम्ही याबाबत निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.