4 खासदार निवडून आणणारे लोकनेते, मग मोदींना काय म्हणायचे ?

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर बोचरी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पाटील यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला. या वादात आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीही उडी घेतली आहे. आमदार पडळकर म्हणाले, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून वारंवार केंद्रातील नेतृत्वावर टीका केली जाते. ज्या पक्षाचे चार खासदार निवडून येतात, त्यांना तुम्ही लोकनेते म्हणता, मग 303 खासदार निवडून आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचे? तुम्ही मोदीवर टीका करता, आम्ही शरद पवार यांच्यावर टीका केली तर इतका त्रागा का करता ? असा सवाल करत पडळकर यांनी मोदींवर टीका करणाऱ्यांनी स्वतःच्या पक्षाची स्थिती समजून घ्यावी, असा खोचक सल्लाही त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ सांगलीत सोमवारी (दि. 23) आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आ. पडळकर बोलत होते. ते म्हणाले, ही निवडणूक केवळ महाविकास आघाडीच्या विरोधातील नसून, ही निवडणूक भ्रष्टाचार, विश्वासघात, प्रखर जातीयवादाच्या विरोधातील आहे. मतदारांनी याचा नीट विचार करावा.

मी कुठेही जाणार नाही, आहे तिथेच थांबणार : खा. पाटील
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे खासदार संजय पाटील आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्यात जवळीक वाढली आहे. अनेक कार्यक्रमात दोघे एकत्र दिसून आले होते, तर भाजपच्या काही कार्यक्रमांना खासदार पाटील उपस्थित नव्हते. यावरून खासदार पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, कोणी काहीही अपप्रचार केली तरी मी कुठेही जाणार नाही. मी आहे तिथेच थांबणार असल्याचे खासदार पाटील यांनी मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले.