मंत्री जितेंद्र आव्हाडांचे ट्विट, म्हणाले – ‘…याचा अर्थ प. बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात होता’

पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. ममता बॅनर्जीनी भाजपाचा धुव्वा उडवल्यानंतर आता देशभरात त्यांच्या ऐतिहासिक विजयाची चर्चा सुरु झाली आहे. याचदरम्यान भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विजयवर्गीय यांच्या विधानाचा हवाला देत एक ट्विट केले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी सर्व भाजपाविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्याने मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसल्याचे विजयवर्गी यांनी म्हटल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे. विजयवर्गी यांच्या या विधानावरुन बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात होता, असा निष्कर्ष आव्हाडांनी काढला आहे.

तृणमूल काँग्रेसने पश्मिच बंगालमध्ये 213 जागांवर विजय मिळवला असून भाजपाला 100 च्या आतच रोखण्यात ममता बॅनर्जी यांना यश आले आहे. भाजपाने 77 जागांवर विजय मिळवला आहे. तत्पूर्वी, निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपाला 50 पेक्षा अधिक जागाही मिळाल्या नसत्या, असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये यावेळी निवडणूक आयोगाचे पॅनल भाजपाचा प्रवक्ता असल्यासारखे वागत होते, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर केला आहे.