माढ्यात कॉंग्रेसला आणखी एक धक्का, ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेस नेते कल्याण काळे यांचा भाजपप्रवेश निश्चित

माढा : पोलीसनामा ऑनलाईन – माढा लोकसभा मतदार संघातील चुरस दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. आता भाजपकडून पुन्हा एकदा कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीला धक्का दिला आहे.  या मतदारसंघांमध्ये प्रभाव असणारे काँग्रेस नेते कल्याण काळे यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदार संघातील चुरस वाढणार आहे.
काळे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांचा सोलापूर जिल्ह्यात चांगला प्रभाव आहे. सोलापूर जिल्ह्यात सोलापूर आणि माढा हे दोन मतदारसंघ येतात. तसेच शिंदे हे स्वतः काँग्रेसकडून सोलापूरचे उमेदवार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर माढा लोकसभेसाठीही काळे यांचा फायदा भाजपला होणार आहे.
भाजप प्रवेशाबाबत कल्याण काळे म्हणाले की, “पक्षात घुसमट होत होती. अनेक वर्षे पक्षाने फायदा घेतला. मात्र काँग्रेसमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवू शकलो नाही. त्यामुळे जनतेचे हित लक्षात घेऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.”
कल्याण काळे भाजप प्रवेशाचा मोठा फटका राष्ट्रवादीचे माढ्याचे उमेदवार संजय शिंदे आणि सोलापूरचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांना बसणार आहे. भाजपची माढा लोकसभेसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही जागा निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आघाडीला धक्के देण्याचे काम भाजप करत आहे. सध्या सोलापुरात भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी आणि माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कल्याण काळे यांच्याविषयी –
सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष
सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष
सिताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक
श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष
राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष