‘वादग्रस्त’ आणि ‘प्रक्षोभक’ भाषणाचा आरोप असलेले भाजपाचे नेते कपिल मिश्रांना Y+ सुरक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली हिंसाचारापूर्वी आपल्या प्रक्षोभक भाषणांमुळे वादग्रस्त ठरलेले भारतीय जनता पार्टीचे नेते कपिल मिश्रा यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. कपिल मिश्रा यांना वाय प्लस दर्जाचे संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत कपिल मिश्रासोबत 24 तास 6 जवान तैनात असतील. काही दिवसांपूर्वीच कपिल मिश्रा यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचे ट्विट केले होते.

गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, कपिल मिश्राला दिल्ली पोलिसांकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. परंतु, गृह मंत्रालय, ज्यांना दिल्ली पोलीस रिपोर्ट करतात, त्यांना या निर्णयाबाबत माहिती नाही. सूत्रांनी सांगितले की, धोक्याचा आढावा स्थानिक पातळीवर दिल्ली पोलिसांनी घेऊन नंतर सुरक्षा दिली असेल.

प्रथम सुरक्षा घेण्यास दिला होता नकार

यापूर्वी कपिल मिश्राला 2017 मध्ये सुरक्षा देण्यात आली होती, जेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर निदर्शने झाली असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी कपिल मिश्रा आम आदमी पार्टीचे आमदार होते. त्यावेळी त्यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. परंतु, काही दिवसांपूर्वी कपिल मिश्राने संरक्षणाची मागणी केली होती.

धमकी मिळाल्याची तक्रार

मागच्या वर्षी भाजपामध्ये आलेल्या कपिल मिश्राने 1 मार्चला ट्विट करून म्हटले होते की, मला भारतातून आणि परदेशातून फोन, व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेलवर धमकी दिली जात आहे. माझ्याविरूद्ध सुरू करण्यात आलेल्या या द्वेषाच्या मोहिमेची मला भिती वाटत नाही.

2 पीएसओ आणि 4 पोलीस कर्मचारी देतील सुरक्षा

कपिल मिश्रा यांच्यासोबत दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकारी असतील जे चोवीस तास त्यांच्यासोबत राहतील. याशिवाय चार आणखी सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, पीएसओमधील एकाकडे एक स्वयंचलित रायफल असेल. तर दुसर्‍याकडे पिस्तूल असेल. अन्य चार पोलीस कर्मचार्‍यांकडे शस्त्रे असतील.

प्रक्षोभक भाषण करण्याचा आरोप

दिल्ली हिंसाचाराच्या एक दिवस आधी म्हणजे 23 फेब्रुवारीला कपिल मिश्राने जाफराबादच्या मौजपुर चौकात नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (सीएए) समर्थनासाठी एका सभेचे नेतृत्व केले होते. यानंतर सीएए समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले आणि हिंसाचार भडकला. या हिंसाचारत आतापर्यंत 46 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कपिल मिश्राच्या विरूद्ध दिल्ली हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत आणि त्याच्या विरूद्ध प्रक्षोभक भाषण देण्याच्या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्ट बुधवारी सुनावणी करणार आहे, तर हार्यकोर्ट 13 एप्रिलला सुनावणी करणार आहे.