Keshav Upadhye : ‘बाळासाहेब म्हणाले होते, कोकणासाठी सरकारचे कान पिळेन, आज त्यांच्याच सुपुत्राने तोंडाला पानं पुसली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळातून सावरणाऱ्या कोकणाला यंदा तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामध्ये कोकणाची मोठी वित्तहानी झाली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड भागातील अनेक घरांचे, आंबा बागयदारांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौरा करुन आश्वासन दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते, अशी विचारणा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर आणि घोषणेवर टीका केली आहे. केशव उपाध्ये यांनी एकामागून एक ट्विट्स करत ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारचे कान पिळेन, अशी जाहीर ग्वाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दिली होती. त्याच कोकणात आज त्यांच्या सुपुत्राने संकटग्रस्त कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली. आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते ? असा सवाल उपाध्ये यांनी शिवसेनेला केला आहे.

ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिलं, त्या शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडून दिले. शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या कोकणच्या कोकणवासीयांची निराशा उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केली. गेल्या वर्षी निसर्ग वादळानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्पेटवर उभे राहून दुरुनच पाहणीचे नाटक केलं होतं. आता मुख्यमंत्री आताच्या संकटाचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करुन नुकसान भरपाई देण्याची खोटी आश्वासने देत आहेत. गेल्या वर्षी भरडलेल्या कोकणाची पुन्हा नवी थट्टा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोकणी जनता प्रश्न विचारेल, हे नक्की, असा इशारा केशव उपाध्ये यांनी दिला आहे.