भाजपचा ठाकरे सरकारला सवाल, म्हणाले – ‘तरूणांच्या लसीकरणाचे नियोजन काय, लस मोफत की सशुल्क? किती लसी मागवल्या?’

पोलीसनामा ऑनलाइनः केंद्र सरकारने 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान राज्यातील 18 ते 44 वयोगटातील 5 कोटी 71 लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे 12 कोटी डोसची आवश्यकता आहे. त्यासाठी लसींची उपलब्धता हे आव्हानात्मक काम असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोेपे यांनी म्हटले आहे. दरम्यान आता राज्यात 1 मे पासून होणाऱ्या तरूणांच्या लसीकरणाचे नियोजन काय आणि हे लसीकरण मोफत आहे का सशुल्क असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. दररोज 8 लाख लसीकरणाचे राज्याने उदीष्ट ठेवले असून त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. अशोक चव्हाण यांनीदेखील ट्वीट करत पुरेशा लसीचा पुरवठा झाला असता तर राज्याने 2 कोटींचा टप्पा ओलांडला असता असे म्हटले आहे. यावर भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीकास्त्र सोडले आहे.

महाराष्ट्रात क्षमता आहेच, पण आपल्या नाकर्त्या धोरणामुळ रोज सरासरी 2 लाख लसीकरण झाले आहे. या संथगतीला इथले सरकार जबाबदार आहे. केंद्र सर्वाधिक लसी पुरवत आहे. पण लसीकरणाच नियोजन नीट केल नाही हे वास्तव आहे. आता 1 मे पासून तरूणांच्या लसीकरणाच नियोजन काय ?  लसीकरण मोफत की सशुल्क ? किती लसी मागवल्या ? असे सवाल उपाध्ये यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे.

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने लसीकरणाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच मोफत लसीकरणाची घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या बुधवारी होणा-या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोफत लसीकरणाचा निर्णय होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.