भाजपचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाले – ‘अग्रलेखांचा बादशाह माहित होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले’

पोलीसनामा ऑनलाइन – देशातील 5 राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची नुकतीच बैठक झाली. निवडणुकांच्या निकालाचे आत्मचिंतन करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसमध्ये बदलांची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. दरम्यान यावरून शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात या बैठकीतील काही मुद्यांवर भाष्य केले आहे. यावरून भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांना टोला लगावला आहे. करप्शन क्वीन ते सोनियाचा संदेश. अग्रलेखांचा बादशाह माहित होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले असे म्हणत उपाध्ये यांनी टीकास्त्र सोडले आहे.

 

 

 

 

 

केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून त्यात कोलांटउडीचे बादशहा, करप्शन क्वीनला शरण असे म्हणत, राऊतांंना टोला लगावला आहे. तसेच यासोबत त्यांनी दोपहर का सामना आणि सामनाच्या आजच्या अग्रलेखाचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान मोदी सरकारविषयी लोकांच्या मानात रोष निर्माण होत आहे. बेरोजगारी, अर्थसंकट, महागाई, कोरोनामुळे पडलेल्या प्रेतांचा खच यामुळे केंद्र सरकारची लोकप्रियता घटली आहे अशा वेळी देशभरातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी ट्विटरच्या फांद्यांवरून उतरून मैदानात उतरणे गरजेचे आहे. पुन्हा मैदानावर उतरणे म्हणजे कोरोना काळात गर्दी करणे नाही. तर सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडणे, हे एक महत्त्वाचे काम सर्वच विरोधी पक्षांनी करणे गरजेचे आहे. काँग्रेसने त्या कामी पुढाकार घ्यावा. सोनियांना बहुधा हाच संदेश द्यायचा असावा असे राऊत यांनी अग्रलेखात म्हटले आहे.