फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्र्यांचं एक ‘सत्य वाक्य’, भाजपने केली टीका

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन – राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे संकट डोके वर काढू लागले आहे. विदर्भातील चार जिल्ह्यांसह मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून काही निर्बंध लागू करण्यात आले आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात तर काही तास लॉकडाऊन जाहीर केला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कडक निर्बंध लागू करण्याबरोबरच शेवटी लॉकडाऊन संदर्भात जनतेला प्रश्न विचारला, त्यावरून भाजपनेते केशव उपाध्ये यांनी ट्विटरद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या राज्यातील कोरोना परिस्थिताचा आढावा घेतला. त्याचबरोबर जगातील परिस्थितीचीही माहिती दिली. आपल्या भाषणाचा शेवट करताना त्यांनी राज्यतील जनतेला एक प्रश्न विचारला की, पुन्हा लॉकडाऊन करायचं का ? या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही घरी बसून दिल असेल हो किंवा नाही. मला ते ऐकू येणार नाही. माझा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचत आहे. पण तुमचा आवाज माझ्या पर्यंत येणे शक्य नाही. त्यामुळे सर्वानी कोरोनाच्या नियमांची अमलबजावणी काटेकोरपणे करावी. पुढील आठ दिवस आपण काय करताय हे पाहणार. कोणीही हलगर्जीपणा करू नये. जर विनामास्क फिरणं, गर्दी करणं, सुरक्षित अंतर न ठेवणं, विनाकारण बाहेर पडणं हे टाळलं जात नसेल तर परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्र्यानी सांगितले. त्यावरून भाजप नेते केशव उपाध्ये यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

उपाध्ये यांनी केलेल्या ट्विट मध्ये असे म्हंटल आहे कि, मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह केलं. त्यात त्यांनी एक सत्य वाक्य बोलले, माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही हे बरोबरच बोलले कारण संकटात सापडलेली जनता मदतीचा हात मागत असताना आपण घरात बसून आहे, त्यामुळे त्यांचा आवाज तुमच्यापर्यँत कसा पोहोचणार? असा प्रश्न उपस्थित करत या सामान्य लोकांना ना मदत ना दिलासा अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्याना टोला लगावला आहे.

मास्क हीच आपली ढाल
फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनावर अजूनपर्यंत औषध नाही दिलासा आहे तो केवळ लसीचा. लसीकरण सुरु झालेलं आहे आतपर्यंत ९ लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आता केवळ एकाच कंपनीची लस मिळत आहे मात्र यापुढील काळात आणखीन दोन-तीन कंपन्या लस देणार आहेत, त्याही लस आपल्याला लवकरच उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री म्हणून मी शिवनेरीवर गेलो, हे माझं भाग्यच. यंदा शिवनेरीवर गर्दी कमी होती पण उत्साह मोठा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढण्याची प्रेरणा दिली. त्यासाठी वार करण्यासाठी तलवार आणि वार झेलायला ढाल दिली. पण, कोरोनाच्या लढाईत मात्र मास्क हीच आपली ढाल आहे त्याचा वापर करूनच कोरोनाला हरवायचा आहे. असेही ते म्हणाले.

पक्ष वाढवूया कोरोना नको
प्रत्येकाला पक्ष वाढवायचा आहे, पण तूर्त तरी नको. त्यामुळे पुढील काही काळासाठी राज्यात मिरवणुका, मोर्चे, यात्रा आणि आंदोलनांना बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. माझे कुटुंब माझे जबाबदारी ही मोहीम आपण यशस्वी केली, त्यानंतर आता आणखी एक मोहीम आपण राबवली पाहिजे. होय, मीच जबाबदार… याचा अर्थ प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे. मास्क वापरणे, हाताला सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर हि जी आपली बंधने आहेत ती निश्चितच पाळली गेली पाहिजे.

काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत बैठक झाली त्यामध्येही मी सांगितलं कि, आपल्याकडे २४ तास आहेत त्याची जर नीट विभागणी केली तर नियंत्रण ठेवता येईल. वर्क फ्रॉम होमद्वारेही आपण कामाची विभागणी करु शकतो. हीच आपली नवीन मोहिम आहे, जी आपली जबाबदारी आहे, होय मीच जबाबदार… असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

ब्रिटनमध्ये लॉकडाऊन आहे
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सर्वच जण धीराने लढलो. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी झाला. पण, मधल्या काळात आपण कोरोनाला गंभीरतेनं घेतलं नाही, नियम पाळण्यात ढिलाई केली. त्याच परिणाम म्हणजे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पाश्चिमात्य देशात अजूनही लॉकडाऊन आहे, ब्रिटनमध्ये डिसेंबरपासून लॉकडाऊन आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपर्क थांबवणं हाच उपाय, असल्याच मुख्यमत्र्यांनी सांगितलं. दरम्यान मुखमंत्र्यांनी मंत्री डॉ नितीन राऊत यांनी मुलाच्या लग्नसंदर्भत घेतलेल्या निर्णयाचं यावेळी कौतुक केलं. ते म्हणाले, माझे मंत्रीमंडळातील सहकारी डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा लग्नसोहळा रद्द केलाय, त्यांनी दाखवलेली ही तत्परता उल्लेखनीय आहे. त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करतो, असेही ठाकरे म्हणाले.

कोविड योद्ध्यांचा सन्मान व्हावा, पण…
कोविड योद्ध्यांचा सन्मान करायलाच हवा, पण तो करताना स्वतः कोविद दूत होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. विदर्भातील अमरावतीमध्ये हजारच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत त्यामुळे हि परिस्थिती आणखी वाढली तर आरोग्य यंत्रणेवर किती ताण पडेल,असा प्रश्नही ठाकरे यांनी उपिस्थत केला. सध्या राज्यात ५३ हजार एक्टीव्ह रुग्ण आहेत. रविवारी राज्यात ७ हजार नवीन रुग्ण सापडले आहे. तर, मुंबईतील आकडा ८०० ते ९०० पर्यंत गेलाय. एकूणच कोरोनाची दुसरी लाट येत आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱयांना बंधने घालण्याचे आदेश दिल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.