आ. सरनाईकांच्या अडचणी वाढणार ? चौकशीदरम्यान सोमय्या 112 ‘सातबारा’सह थेट ED कार्यालयात हजर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांची गेल्या 5 तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. विहंग यांची दुसऱ्यांदा चौकशी सुरू असतानाच भाजपाचे नेते किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल झाले. यानंतर सोमय्या यांनी विहंग हौसिंग सोसायटीच्या घोटाळ्याची ईडीला माहिती दिली. सरनाईक यांनी सोसायटीतील काही संपत्ती हडप केल्याचा आरोप करत सरनाईकांकडे 112 सातबारे असल्याची तक्रारही सोमय्या यांनी आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रताप सरनाईक यांनी 250 कोटी रुपये ढापल्याचे आरोपही किरीट सोमय्या यांनी केले आहे. तसेच त्यांनी कंपनीचे नावही बदलले आहे. प्रताप सरनाईक यांनी ज्या लोकांची संपत्ती जप्त केल्या, त्यांची नावे सातबाऱ्यावर नसल्याचा दावाही सोमय्या यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे ईडी या सर्वप्रकरणावर काय भूमिका घेणार,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान पूर्वेश सरनाईक आज नोटीस देऊनही ईडीसमोर हजर झालेले नाहीत. पूर्वेश यांना आतापर्यंत दोन समन्स बजावण्यात आले आहे.

प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच ठाण्यातील रेमंड कंपनीसमोर सरनाईक यांनी 13 मजल्याचे दोन टॉवर बांधले आहेत. OC न घेताच सर्व फ्लॅटची विक्री केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. सरनाईक यांनी सामान्य नागरिकांची फसवणूक केली असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यांनी यापूर्वीच केली होती.

आ. सरनाईकांनी आरोप फेटाळून लावले
मी प्रत्येक शंकेचे निरसरण ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर केलेले आहे. अजूनही काही शंका असतील तरी 100 वेळा येण्यास मी तयार असल्याचे सांगितले. तसेच चौकशीला सहकार्य करेल असेही स्पष्ट केले आहे. परंतु 10 वर्षापूर्वीचे प्रकरण पुढे आणून माझी बदनामी करण्याचे काम ठाण्यातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी आणि सोमय्या यांनी सुरू केले आहे. त्यामुळे सोमय्या यांनी जी काही बदनामी केलेली आहे. त्याच्या विरोधात मी 100 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.