मला विधान परिषदेचं आश्वासन देण्यात आलं होतं : मेधा कुलकर्णी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्यातील ( Pune) कोथरूड विधानसभा ( Kothrud Assembly) मतदारसंघातील भाजपच्या ( BJP) माजी आमदार मेधा कुलकर्णी ( Medha Kulkarni) या नाराज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बीबीसी (BBC) मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी मुलाखतीत त्यांनी म्हटले, मला विधान परिषदेचा शब्द देण्यात आला होता. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांच्यासाठी मी ती जागा मोकळी केली. मोकळी केली म्हणण्यापेक्षा तो पक्षाचा आदेश असतो आणि ते माझं कर्तव्य होतं. त्यावेळी मला विधान परिषदेवर घेतलं जाईल असं सांगण्यात आलं होतं. आपली सक्रियता, पक्षावरील निष्ठा आणि पक्षाला होणारा उपयोग याचा पक्ष नक्कीच विचार करेल याची खात्री असल्याचा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मुलाखतीमध्ये पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कोथरूडमधून निवडणूक लढवण्याइतकी दुसरी कोणतीही आनंदाची बाब असणार नाही कारण ते माझं माहेर आहे.

सर्व जिवाभावाची मंडळी या ठिकाणी आहेत. कोथरूड माझ्यासाठी स्वर्ग असल्याचेदेखील यावेळी त्यांनी म्हटले. पुढील निवडणुकीत पक्षाकडून संधी मिळाल्यास नक्कीच मला कोथरूडमधून निवडणूक लढवायला आवडेल असेदेखील त्यांनी म्हटले. मी कोणत्या अन्य पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे किंवा मला तिकीट देण्यासाठी कोणी प्रयत्नशील आहे, अशा बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मी एक व्हिडिओ केला होता आणि जे कोणी हा खोडसाळपणा करत आहे, त्यांनी हा खोडसाळपणा बंद करण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर भाजपने पदवीधर मतदारसंघात जो उमेदवार दिला आहे, त्याचे काम आपण करणार असल्याचेदेखील त्यांनी म्हटले. मागील अनेक वर्षे मी भाजपसाठी काम करत आहे.मला समाजासाठी काही करायचं आहे. ते करण्यासाठी काही जबाबदारी असावी. अगदी मला चीनच्या सीमेवर पाठवलं तरी चालेल, असेही त्यांनी म्हटले.

पक्षावर नाराज नाही

दरम्यान, कुलकर्णी या पक्षावर नाराज असल्याचेदेखील म्हटले जात होते. मी माझे संपूर्ण आयुष्य भाजपसाठी खर्च केले आहे. कोणाच्या कार्यशैलीविषयी माझी नाराजी असेल किंवा काही म्हणणं असेल, तर ते पक्षीय पातळीवर नक्कीच मांडेन. ते माझ्या नाही तर पक्षाच्या हितासाठी मांडेन. मी कायमस्वरूपी पक्षातही आहे. संघाची विचारशैली असल्याने मी पक्षावर नाराज असण्याचा विषयच नसल्याचेदेखील त्यांनी यावेळी म्हटले.