भाजपच्या ‘त्या’ उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यावर फसवणूकीचा गुन्हा

संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांच्या बनावट सहीचे पत्र दाखवून फसवणूक

हैद्राबाद : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पी. मुरलीधर राव यांच्यासह ८ जणांवर फसवणूक केल्याप्रकरणी हैद्राबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका फार्मा एक्झाईलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांच्या सहीचे नियुक्ती पत्र दाखवून २ कोटी १७ लाख रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

न्यायालायच्या आदेशाने पी. मुरलीधर राव यांच्यासह नऊ जणांविरोधात भादंवि ४०६, ४२०, ५०६ १२० आणि सीरआरपीसी १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवर्णा रेड्डी यांनी तक्रार केली होती.

ईश्वर रेड्डी याने तक्रारदार प्रवर्णा रेड्डी यांची कृष्ण किशोर याच्याशी भेट घालून दिली. तो भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस पी. मुरलीधर राव यांचा निकटवर्तीय असून अनेक सदस्यांच्या खुप जवळचा आहे, असे सांगण्यात आले. त्यांनी प्रवर्णा रेड्डी यांचे पती महिपाल रेड्डी यांना वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या फार्मा एक्झाईलचा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्याचे अमिष दाखवले. त्यासाठी त्यांनी पती पत्नीकडून २ कोटी १७ लाख रुपये घेतले. त्यानंतर महिपाल रेड्डी यांची नियुक्ती केल्याचे तत्कालीन वाणिज्य मंत्री निर्मला सितारमन यांच्या सहीचे पत्र दाखवले.

मात्र, महिपाल रेड्डी यांची नेमणूक या पदावर करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी आपले पैसे परत मागितले. तेव्हा मुरलीधर राव यांनी त्यांना धमकावले. त्यानंतर इश्वर रेड्डी यांनी त्यांचे पैसे देण्याचे आश्वासन तर दिले मात्र, ते पैसे परत दिले नाहीत. असे तक्रारीत म्हटले आहे.

मुरलीधर राव यांनी या सर्व प्रकाराबाबत नकार दिला आहे. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा खासगी तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे आणि ज्यांच्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत त्यांनीच तक्रार केली आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे.