धारधार शस्त्राने भाजप नेत्याचा खून ; परिसरात खळबळ 

भोपाळ : मध्य प्रदेश वृत्तसंस्था –  भाजपचे स्थानिक नेते असलेल्या मनोज ठाकरे यांची धारधार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याचा प्रकार मध्यप्रदेशात घडला आहे. मध्य प्रदेशातील बडवानी भागाचे भाजपचे विभाग प्रमुख मनोज ठाकरे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अनपेक्षित रित्या झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

मनोज ठाकरे यांच्यावर रविवारी पहाटे अज्ञात इसमाने धारधार शस्त्राने वार करत हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोज ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मनोज ठाकरे यांच्यावर वार करून त्यांचा मृतदेह शेजारील झाडीत फेकून देण्यात आला. दिवस उजाडताच गावा शेजारी असणाऱ्या शेतात लोक कामासाठी निघाले असता त्यांचा मृतदेह लोकांना दिसला तेव्हा त्यांनी पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पुढील चाचणीसाठी रवाना केला.

दरम्यान भाजपच्या संबंधित व्यक्तीची हत्या होण्याची या आठवड्यातील हि दुसरी घटना आहे. मागील काही दिवसापूर्वी भाजप नेते आणि मंदसौर नगरपालिकेचे अध्यक्ष प्रल्हाद बंधवार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यात ज्या प्रमाणे भाजप नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात येत होत्या त्यांच प्रमाणे हे सत्र आता मध्य प्रदेशात हि सुरु झाले आहे का असा सवाल सर्वत्र विचारला जाऊ लागला आहे. तर अशा प्रकारामुळे नव्याने स्थापन झालेल्या कमलनाथ सरकार वर कायदा सुव्यवस्था राखण्याच्या मुद्द्यवरून आग पाखड होऊ लागली आहे.