‘बिल्डर’कडून 3 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपच्या नेत्याला अटक, सर्वत्र प्रचंड खळबळ

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाला ३ कोटी रुपयांची खंडणी मागून त्याच्याकडून ३ लाख रुपयांची वसुल केल्या प्रकरणी ठाणे महापालिकेतील भाजपाचे गटनेते व नगरसेवक नारायण पवार यांना कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.

घोडबंदर रोड येथील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या विरुद्ध ३ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करीत कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. या तक्रारीनंतर अटक टाळण्यासाठी नारायण पवार यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार देऊन त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर ते फरार झाले होते. गेल्या काही दिवसांपासून कासारवडवली पोलीस त्यांच्या मार्गावर होते. सोमवारी सकाळी पोलिसांनी नारायण पवार यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे़.