‘मर्दाला मर्द असल्याचं सांगावं लागत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुलाखतीत मी मर्द आहे, मी मर्द आहे, असे सांगत आहेत. मर्दाला मर्द असल्याचे सांगावे लागत नाही. आता यांची पण एकदा चाचणी करावी लागेल, असा सणसणीत टोला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. सरकार पाडून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे देत आहेत. पण हे स्वतःच पडणार आहेत, असे भाकीतही राणे यांनी वर्तवले.

संजय राऊत यांनी नुकतीच ‘सामना’ वृत्तपत्रासाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना नारायण राणे म्हणाले, विरोधकांना धमक्या देणे, ईडी, सीबीआयला धमक्या देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या मुलाखतीत केलं. हात धुऊन कोणाच्या मागे लागणार ईडीच्या, सीबीआयच्या की भाजपच्या नेत्यांच्या ? तुमचे ५६ आमदारांचे सरकार किती दिवस चालणार. केंद्राच्या अखत्यारीतील संस्थांवर काय कार्यवाही करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हिंदुत्वासाठी, शेतकऱ्यांसाठी, लोकहितासाठी मुख्यमंत्र्यांनी काय केलं, हा प्रश्न आहे. कोरोना रुग्ण, बळींबाबत महाराष्ट्र राज्य एक नंबर आहे. त्याचसोबत सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांचे प्रकरण आम्ही विसरलेलो नाही, असा इशाराही राणे यांनी दिला. आपल्याला प्रशासकीय ज्ञान नाही असे उद्धव ठाकरे यांनी कबूल केले आहे, असे टीकास्त्र राणे यांनी सोडले.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री स्वतः कार चालवत मंत्रालयात गेल्याबाबत त्यांचे गौरवोद्गार काढले. पण महाराष्ट्राला कर्तृत्वान मुख्यमंत्री हवा आहे, ड्रायव्हर नको, असा चिमटाही त्यांनी काढला. एका वर्षाचा निष्क्रीय कारभार, अधोगतीकडे नेणारा कारभार, कोणत्याही विषयाचे ज्ञान नसलेले मुख्यमंत्री यामुळे महाराष्ट्र अधोगतीकडे चालल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला.

हात धुऊन मागे लागण्याच्या धमक्या देऊ नका, आम्ही मागे लागलो तर झोप येऊ देणार नाही. १०० जणांच्या कुंडल्या माहिती आहेत. बंद दरवाजा आडच्या मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्या अनेक गोष्टी माहिती आहेत, असा इशाराही नारायण राणे यावेळी दिला.