जिवाचं बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार : नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कपात केल्यामुळे पुन्हा एकदा राजकारण रंगू लागलं आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे. रात्री उशिरा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेतून पायलट वाहन आणि बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली. तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली आहे.

दरम्यान, या सरकारच्या निर्णयावर नारायण राणे संतापले आहेत. “माझी सुरक्षा काढल्याने मला काही तक्रार नाही. पण माझ्या जिविताचं काही बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार राहील,” असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. (BJP leader Narayan Rane criticizes the state government for decrease security) यावेळी, राज्य सरकार ज्या भावनेनं काम करतंय. त्याचा उद्देश काय? हे मला माहित नाही. आम्ही यासाठी सरकारकडे दाद मागणार नाही. आमचे संरक्षण राज्यातील जनता करत आहे, असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून माझी सुरक्षा कमी करा, अशी सूचना केली आहे. (decrease my security ncp supremo sharad pawar calls home minister anil deshmukh) त्यामुळे त्यांनी विरोधकांचा आरोपातील हवा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे असे बोलले जात आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी भाजप पक्षातील नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.