उद्धव ठाकरे जे जेवतात ते 10 रुपयात मिळणार का ? नारायण राणेंचा ‘हल्लाबोल’

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेचे सरकार आल्यास गरीबांसाठी दहा रुपयात जेवण देऊ अशी घोषणा केली होती. राज्यात शिवसेनेने भाजपसोबत दूर होत काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेक निर्णय घेतले. यामध्ये शेतकरी कर्जमाफी आणि दहा रुपयांत जेवण या दोन योजना जाहीर केल्या.

राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. सध्या सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक आहे. त्यावरुन भाजप आणि शिवसेनेत घमासान सुरु आहे. शिवसेनेचे नेते दिपक सावंत यांनी नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली होती. त्याला भाजपने जोरदार उत्तर दिले. आता नारायण राणे यांनी शिवथाळीवरून थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांचं युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.

शिवथाळी ही उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी योजना होती. गरीबांसाठी दहा रुपयात जेवण देण्याची ही योजना आहे. शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात या योजनेचा समावेश केला होता. आता खुद्द ठाकरेच मुख्यमंत्री झाल्याने शिवथाळी योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. त्यावरुन नारायण राणे यांनी तोफ डागली. राणे म्हणाले, उद्धव ठाकरे जे जेवतात तेच जेवण दहा रुपयात देणार का ? मुंबई महापालिकेत फक्त कर्मचाऱ्यांसाठी अशी योजना सुरु केली. त्याला 40 रुपये अनुदान दिले जातय. म्हणजे 50 रुपयात थाळी पडते. सरकार जे अनुदान देतं ते लोकांनी दिलेल्या टॅक्सच्या पैशातून दिले जाते. शिवसेनेला यातून भ्रष्टाचार करायचा आहे अशी टीका त्यांनी केली आहे. शिवसेनेने भ्रष्टाराचाविषयी बोलूच नये त्यांची सर्व कुंडली माझ्याकडे असल्याचे राणे यांनी म्हटलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/