केसरकरांच्या आरोपानंतर राणे भडकले, म्हणाले – ‘मर्द होतास तर तपास का नाही केला ?’

सिंधुदुर्ग  :  पोलीसनामा ऑनलाइन – कोकणात खरा सामना रंगतोय तो म्हणजे राणे विरुद्ध शिवसेना असा. युती तुटल्यानंतर सावंतवाडीत पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. आत्तापर्यंत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवत होते आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. ‘नारायण राणे यांच्याकडील पैशाला रक्ताचा वास आहे,’ असा गंभीर आरोप शिवसेना नेते दीपक केसकर यांनी केला होता. केसरकरांच्या या टीकेला राज्यसभा खासदार नारायण राणे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

‘मर्द होतास तर का नाही तपास केला’ असे नारायण राणे यांनी गुंडगिरीचा आरोप करणाऱ्या दीपक केसरकर यांना प्रश्न केला. त्याचबरोबर नारायण राणे म्हणाले की, ‘केसकरांनी सावंतवाडीत एकही विकास प्रकल्प सुरु केला नाही. माझ्यावर खुनाचा आरोप करणाऱ्या केसकरांनी 5 वर्ष गृहराज्यमंत्री असताना तपास का केला नाही.’ सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीचं राजकारण चांगलंच तापलं असून शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणेंसह भाजपाच्या नेत्यांवर कडाडून टीका केली.

राणेंसह भाजपाच्या नेत्यांकडून सावंतवाडी निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या पैशाला खुनाचा, खंडणीचा आणि रक्ताचा वास असल्याचा गंभीर आरोप केसरकर यांनी केला होता. त्याचबरोबर वेळ पडल्यास भाजपाच्या इतर नेत्यांची कुंडली आपण बाहेर काढू असाही इशारा त्यांनी दिला होता. दीपक केसरकर यांनी राणेंसह भाजपवर जहरी टीका केल्यानंतर भाजपनेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. केसरकर हे श्वान परंपरेतले असल्याची टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद यांनी केली होती. त्यामुळे 29 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार धुमशान सुरु झालं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/