नारायण राणे यांचा CM ठाकरे यांच्यावर पलटवार, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढले आहे, सरकारी पैशातून नाही. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी, या शब्दांत भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्द्व ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये विविध विषयांवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाइन उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर अनुल्लेखाने टीका केली. तुम्ही रत्नागिरीसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मागितले. तुम्ही स्वत: साठी काही मागू शकला असतात. मात्र, तसे केले नाहीत. काही जण असतात, इकडे तिकडे काही करून स्वत: साठी काही ना काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी मागितले. याचा मला अभिमान वाटतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही स्वत: साठी काही मागितले नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या याच टीकेवर आता नारायण राणे यांनी पलटवार केला आहे.