उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करुन दाखवावी, नारायण राणेंचा पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधक सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर अनेक विषयांवरुन हल्लाबोल करत आहेत. राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असल्याचे पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांचे नाव न घेता टीका केली. यावर नारायण राणे यांनी ट्विट करुन पलटवार केला आहे.

लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाईन उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, मेडिकल कॉलेजची घोषणा आजही मी करु शकतो. मात्र, मला खोटे बोलता येत नाही. कोकणात कॉलेज करायचे हे माझ्या लक्षात आहे. हे काम करु शकतो की नाही, याची खात्री होत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला शब्द देणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला नारायण राणे यांनी ट्विट करुन जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नारायण राणेंचा पलटवार

नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे. सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करुन दाखवावी, अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला आहे.

 

उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, रत्नागिरीसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मागितले. तुम्ही स्वत:साठी काही मागू शकला असता. मात्र तसे केले नाही. काही जण असतात, इकडे तिकडे काही करुन स्वत: साठी काही ना काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी मागितले. याचा मला अभिमान वाटतो. तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक आहेत. त्यामुळेच तुम्ही स्वत:साठी काही मागितले नाही, अशी टीका त्यांनी केली.