‘मराठा समाजानं आंदोलन करू नये हे सांगण्याचा नैतिक अधिकार सरकारला नाही’ : नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   मराठा आरक्षणाला गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर आता तिढा निर्माण झाला आहे. मराठा समाजातील नाराजी वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आंदोलन न करण्याचा आवाहन केलं. यानंतर आता भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आंदोलन करू नये हे सांगण्याचा नैतिक अधिकार सरकारला नाही असं मत राणेंनी व्यक्त केलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं आहे.

नारायण राणे म्हणाले, “समाजानं आंदोलन करून नये हे सांगण्याचा नैतिक अधिकार राज्य सरकारला उरला नाही. अन्याय झाल्यास त्याविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार संविधानानं प्रत्येकाला दिला आहे. मराठा समाजानं आतापर्यंत संयम बाळगला. आता मात्र असं होणार नाही” असंही राणे म्हणाले आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकार ऐकत नाही तेव्हा आंदोलन करायचं असतं. सरकार खंबीरपणे, ठामपणे तुमच्यासोबत आहे. कोणताही पक्ष आरक्षणाविरोधात बोलत नाहीये.” असं म्हणत त्यांनी पुन्हा आंदोलन न करण्याचं आवाहन केलं आहे. लढाई जिंकण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करू असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.