राणे समर्थकांचा विनायक राऊतांना इशारा, म्हणाले – ‘आमच्या नेत्याच्या वाटेला जाल तर याद राखा’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर सिंधुदुर्गाचे दुर्दैव असेल. बुडत्याला काडीचा आधार, अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली होती. यावरुन राणे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी खासदार राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. एवढेच नव्हे, तर आमच्या नेत्याच्या वाटेला जाल तर याद राखा, असा इशाराच राणे समर्थकांनी खासदार राऊत यांना दिला आहे.

भाजपकडून खोटारडेपणाचे राजकारण सुरु आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे. ती निष्ठूरपणे राबवायची हा त्यांचा एकमेव धंदा आहे. नारायण राणे आणि अमित शाह यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली ही युती लाईफटाईम टिको अशी अपेक्षा असल्याचे खासदार राऊत म्हणाले होते. नारायण राणेंच्या हॉस्पिटलला शिवसेनेने विरोध केला नाही. याउलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फाईल आली, तेव्हा तातडीने मंजुरी दिली. राणेंच्या कंगालपणामुळे हा प्रस्ताव रखडल्याचा दावा खासदार राऊत यांनी केला होता.

विनायक राऊत स्वतः नॉन मॅट्रिक : निलेश राणे यांचा पलटवार
दरम्यान, नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विनायक राऊत हे दोन वेळा भाजपाच्या लाटेवर निवडून आले आहेत. हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा. हे स्वत: नॉन मॅट्रिक आहेत. लोकसभेत बोलायला उभे राहिले की, काय बोलतात तेच समजत नाही. मातोश्रीवरचा चप्पलचोर, बाळासाहेब असताना थापा होता, तो गेला असेल, आता नवीन थापा झालाय, असा जोरदार पलटवार निलेश राणे यांनी केला.