भाजप नेत्याचा घणाघाती आरोप, म्हणाले – ‘नाईट लाईफच्या नावाखाली पेंग्विन मुंबईची वाट लावतोय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असताना राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीमधील एका पबमध्ये सुरु असलेल्या पार्टीचा व्हिडीओ शेअर करत आज मनसेने कोरोनाच्या नियमावलीला हरताळ फासला जात असल्याचे समोर आणले. मनसे नेते संतोष धुरी यांनी पबमधून फेसबुक लाईव्ह करुन हा प्रकार समोर आणला.

यानंतर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत घणाघाती आरोप केला आहे. निलेश राणे यांनी ट्विटरवर पबमधील व्हिडीओ शेअर केला आहे. निलेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे जिथून निवडून आले आहेत. त्या वरळी भागात पब, दारु आणि धिंगाणा जोरात सुरु आहे. मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या मुलाच्या मतदारसंघात कोरोना दिसत नाही. नाईट लाईफच्या नावाखाली पेंग्विन मुंबईची वाट लावतोय. तर दुसऱ्या बाजूला त्यांचेच मित्र हे क्लब चालवतात, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

मनसेचे पबमधून फेसबूक लाईव्ह
मनसेचे नेते संतोष धुरी यांनी फेसबुक लाईव्ह करुन आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री ठाकरे पत्रकार परिषदेत कोरोना संपला नसल्याचं सांगतात. पण वरळीतल्या कमला मिलमध्ये 12 वाजून गेल्यानंतरही पब सुरु आहे. इतर ठिकाणी 11 वाजता पब बंद होतात. मग वरळीतले पब रात्री 12 ते 1 पर्यंत कसे सुरु असतात. त्यांना कोण परवानगी देतं ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच वरीळीतील पबमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार धुरी यांनी समोर आणला आहे.

युवराजांच्या मतदारसंघात नियमांचे उल्लंघन
मनसे नेते संतोष धुरी यांनी केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होता दिसत आहे. पबमध्ये सोशल डिस्टन्सिंग दिसत नाही. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नाहीत. यावरुन धुरी यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री सांगतात अद्याप कोरोना संपलेला नाही. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात नियम धाब्यावर बसवले जातात. सामान्य लोकांसाठी कोरोना आहे. पण श्रीमंतांसाठी कोरोना नाही. युवराज आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ही परिस्थिती असल्याचे धुरी सांगतात.