रामदास कदमांना निलेश राणेंचा टोला, म्हणाले – ‘आज तुम्हाला शिवी घालणार नाही, कारण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तीन पक्षांनी मिळून 36 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झाले असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेने ऐनवेळी संजय राऊत यांच्या भावाचा पत्ता कट करुन आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. त्यामुळे नाराज असलेले सुनिल राऊत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली. मात्र, त्यांनी नाराजीचे वृत्त खोडून काढले. तसेच शिवसेनेचे नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे देखील मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त करत शिवसेना नेते पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी रामदास कदम यांना ट्विटच्या माध्यमातून टोला लगावला आहे.

निलेश राणे राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खूष करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले. तुम्ही आम्हाला शिव्या घालून तुम्ही शिवसेनेशी किती निष्ठावान आहात हे दाखवायचा, पण आज तुम्हाला उलट शिवी घालणार नाही कारण ती तुम्हाला बसलेली असल्याचे म्हणत निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/