‘मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो, पण हे 7 तास गाडी चालवताहेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक वर्षाची परंपरा असलेली वारी यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा मात्र पंढरपूरमध्ये संपन्न झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी ही महापूजा केली. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे मुंबईवरून स्वत: गाडी चालवत पंढरपूरमध्ये पोहचले.

मुंबई ते पंढरपूर हा प्रवास करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री साडेआठच्या सुमारास पंढरपूरमध्ये दाखल झाले. मुंबई ते पंढरपूर या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी स्वत:च गाडी चालवली. स्वत: गाडी चालवत पंढरपूरला महापूजेसाठी जाणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असताना भाजपचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ते मुंबई स्वत: गाडी चालवली. बरोबर आहे, सरकार अधिकारी चालवतायत, मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. पण इकडे 7 तास मुख्यमंत्री गाडी चालवतो म्हणजे कोरोना या विषयावर सरकार किती गंभीर आहे दिसून येते, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. तसेच उद्या ते गाडी पण धुतील तर आम्ही काय करू, असा टोला देखील निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लागवला आहे.