खोलीत दोन ‘हाणा’, पण बाहेर ‘साहेब’ म्हणा ही ‘शिवसेने’ची जुनी ‘सवय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात तीन पक्षांचे तीन वेगवेगळ्या विचारांचे सरकार कसे चालणार ? असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी याला विरोध केला होता. मात्र, आम्ही सोनिया गांधी यांना राजी केले, असा गौप्यस्फोट राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केला. तसेच सोनिया गांधी यांनी दिलेल्या सूचना उद्धव ठाकरे यांना सांगितल्यावर त्यांनी काही हरकत नाही आणि संविधानाच्या बाहेर जाणार नाही असे आश्वासन दिल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

तिन पक्षांचे सरकार स्थापन करण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा विरोध होता, मात्र, आम्ही त्यांना राजी केले. परंतु त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, असं न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायचं अशी कडक सूचना दिली. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाही. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतल्यामुळे हे सरकार स्थापन झाल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

यावरून निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले, कोणीही शिवसेनेला टपली मारून जातं हल्ली. शिवसेना पक्ष लिहून, चाटून सत्तेत आला ह्यात काही नवल नाही. शिवसेना चाटूगिरी करूनच सत्तेत आली, हे जग जाहीर आहे. खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही त्यांची जुनी सवय असल्याचे निलेश राणे यांनी म्हटलं आहे.