नितेश राणे यांचा ठाकरे सरकारला खोचक सवाल, म्हणाले – ‘मंत्र्यांना झालेला कोरोना खरा की राजकीय ?’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन  –  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच 1 मार्चला अधिवेशन आहे आणि गेल्या आठ दिवसांमध्ये मंत्र्यांना कोरोना होण्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा आहे की राजकीय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आगामी अधिवेशनात भाजपच्या प्रश्नांना द्यायला यांच्याकडे उत्तर नाही. म्हणून राज्य सरकार कोरोनाचा आसरा घेत नाही ना हा प्रश्न माझ्या मनात आहे. WHO ला पत्र लिहून या कोरोनाबाबत संशोधन करण्यासाठी सांगणार आहे, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यात गेल्या दीड वर्षापासून फिरणा-या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना तेंव्हा कोरोना झाला नाही. मात्र आता अधिवेशनाला आठ दिवस शिल्लक असतानाच त्यांना कोरोना झाला आहे. छगन भुजबळांनाही सकाळीच कोरोना झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील संवाद यात्रेसाठी राज्यभर फिरत होते. त्यांना तेंव्हा कोरोना झाला नव्हता. तोही काही दिवसांपूर्वी झाला. म्हणून हा एक वेगळ्या प्रकारचा कोरोना महाराष्ट्रात आला नाही ना असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाल्याचा टोला राणे यांनी लगावला आहे. दरम्यान आता वेगळ्या प्रकारचा सामना वाचायला मिळत आहे. बाळासाहेबांच्या काळात हिंदुत्वाचा गवगवा करणारा सामना आम्ही वाचलाय. मात्र उद्धव ठाकरेंचा नवीन सामना मार्केटमध्ये येतोय. हिंदूंच्या सणांना विरोध केला जातोय. हिंदूविरोधी सामना वाचायचा आम्ही बंद केला आहे, अशा शब्दांत राणे यांनी सामनावर टीका केली आहे.